झेप वार्ता | प्रतिनिधी पुणे
एमपीडीएतील पाहिजे आरोपीसह वर्षभरापासून फरार आरोपी जेरबंद; साताऱ्यातून दोघांना अटक
पुणे : फरार आणि पाहिजे आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे शहर पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सातारा जिल्ह्यातील म्हसवड परिसरातून दोन फरार आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एमपीडीए कारवाईतील पाहिजे आरोपी आणि गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यात तब्बल एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीचा समावेश आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अजित सागर कसबे (वय २१, रा. आंबेगाव पठार) आणि ओंकार महेश थोरात (वय २५, रा. जांभुळवाडी, आंबेगाव पठार) अशी आहेत.
अजित कसबे हा सहकारनगर पोलीस ठाण्याच्या एमपीडीए कारवाईतील पाहिजे आरोपी होता. तर ओंकार थोरात हा गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यात गेल्या वर्षभरापासून फरार होता.
गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने म्हसवड पोलिसांची मदत घेत दोघांचा शोध घेतला. त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना सहकारनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश माने, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोहार आणि गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
फरार आरोपींचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना मिळालेले हे यश गुन्हेगारांसाठी स्पष्ट इशारा मानले जात आहे. झेप वार्ता संपादिका - परवीन पानसरे

Post a Comment
0 Comments