Type Here to Get Search Results !

सार्वजनिक रस्त्यावर दिशादर्शक फलकांच्या खांबांवर अनधिकृत फलक लावणाऱ्यावर सासवढ पोलीसांचा कारवाईचा बडगा. दोन स्वतंत्र गुन्हे दाखल.

 

सार्वजनिक दिशादर्शक फलकांवर जाहिरात फ्लेक्स लावणाऱ्यांना सासवड पोलिसांचा दणका!

दोन स्वतंत्र गुन्हे दाखल; जाहिरातदारांसह फ्लेक्स लावणाऱ्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू

सासवड | झेप वार्ता     संपादिका  -परवीन पानसरे 



सार्वजनिक रस्त्यांवरील दिशादर्शक फलकांच्या खांबांवर अनधिकृतपणे जाहिरातींचे फ्लेक्स लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण करणाऱ्यांविरुद्ध सासवड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा प्रकारांमुळे वाहनचालकांना अडथळा निर्माण होण्यासह अपघाताचा धोका संभवत असल्याने पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे सासवड पोलीस स्टेशनचे पथक गस्त घालत असताना ही बाब निदर्शनास आली.

पहिली कारवाई – गंधर्व लॉजचा जाहिरात फ्लेक्स

सासवड रोड ते बोपदेव घाट परिसरात पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक रस्त्यावरील दिशादर्शक चिन्हांच्या खांबावर ‘गंधर्व लॉज’ या नावाचा जाहिरात फ्लेक्स अनधिकृतपणे लावल्याचे आढळले. याप्रकरणी सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ५४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८५ तसेच महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध अधिनियम, १९९५ चे कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई – Bora Valley चा जाहिरात फ्लेक्स

सासवड–जेजुरी रोड ते शिवरी हायवे परिसरात पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास ‘Bora Valley’ या नावाचा जाहिरात फ्लेक्स दिशादर्शक फलकाच्या खांबावर अनधिकृतपणे लावल्याचे आढळून आले. याप्रकरणी गुन्हा रजि. नं. ५४८/२०२६ अन्वये संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही प्रकरणांचा तपास परि. पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत. संबंधित जाहिरातदार, मालक, डेव्हलपर तसेच फ्लेक्स लावणाऱ्या व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. दोषींविरुद्ध नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण टाळण्याचे पोलिसांचे आवाहन

सार्वजनिक रस्ते, दिशादर्शक फलक, वीज खांब आणि इतर सार्वजनिक मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर किंवा फ्लेक्स लावू नयेत, असे आवाहन सासवड पोलिसांनी नागरिकांना केले आहे. अशा प्रकारांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तातडीने सासवड पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

अनधिकृत जाहिरातींमुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी सासवड पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.           

— झेप वार्ता | संपादिका  - परवीन पानसरे

Post a Comment

0 Comments