Type Here to Get Search Results !

पुरंदर मधील काळेवाडी येथे जुन्या वादातुन तरुणावर प्राणघातक हल्ला, तिघांविरुद्ध सासवड पोलीस स्टेशनं येथे गुन्हा दाखल.

 


     पुरंदर  मधील  दिवे जवळील काळेवाडी येथे जुन्या भांडणातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल, पुरंदर तालुक्यात खळबळ


सासवड   - प्रतिनिधी    

पुरंदर तालुक्यातील मौजे दिवे येथील काळेवाडी पुलाजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून एका २४ वर्षीय तरुणावर कोयत्याने व दगडाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात अक्षय अजय शिंदे (वय २४) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात तीन जणांवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हात धरून कोयत्याने सपासप वार

मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजण्याच्या सुमारास आरोपींनी संगनमताने अक्षय शिंदे याला काळेवाडी पुलाजवळ बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी सनी सोनवणे आणि पलेश सोनवणे यांनी अक्षयचे हात घट्ट धरून ठेवले, तर आरोपी प्रतीक सोनवणे याने त्याच्या हातातील कोयत्याने अक्षयच्या डोक्यावर आणि दोन्ही हातांवर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले.

खाली पडल्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण व डोक्यात दगड

कोयत्याच्या वारामुळे अक्षय रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्यानंतरही आरोपी थांबले नाहीत. तिघांनी मिळून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि डोक्यात दगड मारून घटनास्थळावरून पळ काढला. या जीवघेण्या हल्ल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी जखमी अक्षयचे वडील अजय भिमराव शिंदे (वय ४६, रा. दिवे, आर.टी.ओ. रोड, ता. पुरंदर), जे टाटा मोटर्स सासवड येथे वॉचमन म्हणून कार्यरत आहेत, त्यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यांच्यावर दाखल झाला गुन्हा:

१. प्रतीक शैलेश सोनवणे

२. सनी शैलेश सोनवणे

३. पलेश मनोज सोनवणे (सर्व रा. दिवे, ता. पुरंदर, जि. पुणे)

सासवड पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.न्या.सं. (BNS) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५१(४), आणि ३(५) अन्वये गुन्हा (रजि. नं. ५४६/२०२६) दाखल केला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सय्यद करत असून पुढील तपास चालू आहे.

                                                                                          झेप वार्ता  -संपादिका * परवीन पानसरे *

Post a Comment

0 Comments